द्रव्य गुण

द्रव्याच्या मूळ स्वरूपाला आणि ओळखीला गुण म्हणतात. गुण हे द्रव्यामध्ये कायमस्वरूपी (सर्व काळात आणि सर्व अवस्थांमध्ये) विद्यमान असतात. द्रव्यापासून गुण कधीही वेगळे करता येत नाहीत.
        द्रव्याश्रया निर्गुणा गुणाः ॥ -- तत्त्वार्थसूत्र अध्याय ५, सूत्र ४१
अर्थ: जे नेहमी द्रव्याच्या आश्रयाने राहतात आणि ज्यांच्यामध्ये स्वतःचे दुसरे गुण नसतात, त्यांना 'गुण' म्हणतात.

जैन तत्त्वज्ञानात गुणांचे दोन मुख्य प्रकार सांगितले आहेत:
1. सामान्य गुण: जे गुण विश्वातील सर्व ६ द्रव्यांमध्ये समान रीतीने आढळतात.
        अत्थिप्तं च पमेयं अगुरुलहू सव्वदव्वसामण्णा।" नियमसार गाथा ५०
अर्थ: अस्तित्व, प्रमेयत्व, अगुरुलघुत्व हे गुण सर्व द्रव्यांमध्ये सामान्य रूपाने आढळतात.
  • अस्तित्व: स्वतःचे अस्तित्व असणे.
  • वस्तुत्व: विशिष्ट कार्य करण्याची क्षमता असणे.
  • द्रव्यत्व: ज्याच्यामुळे द्रव्यात निरंतर पर्याय (अवस्था) बदलत राहतात.
  • प्रमेयत्व: जे ज्ञानाचा विषय बनू शकते.
  • अगुरुलघुत्व: द्रव्याचा मूळ स्वभाव कधीही नष्ट न होणे किंवा बदलून भलतेच न होणे.
  • प्रदेशवत्त्व: विशिष्ट आकार किंवा जागा व्यापण्याची क्षमता.
2. विशेष गुण: जे गुण एका विशिष्ट द्रव्यातच आढळतात आणि त्याला इतर द्रव्यांपासून वेगळे करतात.
        जीवस्स य चेदणा पुग्गलस्स य फरिस रस गंध वण्णा।" नियमसार गाथा ५१
अर्थ: जीवाचा विशेष गुण चेतना आहे, तर पुद्गलाचे विशेष गुण स्पर्श, रस, गंध आणि वर्ण आहे
  • जीव द्रव्याचे विशेष गुण: ज्ञान, दर्शन, सुख, वीर्य (सामर्थ्य), चेतना.
  • पुद्गल द्रव्याचे विशेष गुण: स्पर्श, रस (चव), गंध (वास), आणि वर्ण (रंग).
द्रव्य आणि गुण यांतील संबंध

        ण वि होदि दव्वविहीणो गुणो य गुणदो य दव्वमत्थंतरं।" पंचास्तिकाय गाथा १३

अर्थ: द्रव्याशिवाय गुणांचे कोणतेही स्वतंत्र अस्तित्व नसते आणि गुणांपेक्षा द्रव्य वेगळे (भिन्न) नसते. गुणांचा समूह म्हणजेच द्रव्य होय.
         द्रव्याश्रया निर्गुणा गुणाः ॥ -- तत्त्वार्थसूत्र - अध्याय ५, सूत्र ४१
अर्थ: गुण हे नेहमी द्रव्याच्या आश्रयाने राहतात (गुणांना स्वतःचे वेगळे गुण नसतात). म्हणजेच द्रव्याशिवाय गुणांचे आणि गुणांशिवाय द्रव्याचे स्वतंत्र अस्तित्व नाही.

द्रव्य आणि गुण हे एकमेकांपासून वेगळे करता येत नाहीत. गुणांच्या समूहालाच 'द्रव्य' म्हटले जाते उदाहरणार्थ, साखरेचा मुख्य गुण 'गोडवा' आहे. साखरेपासून गोडवा किंवा गोडव्यापासून साखर वेगळी करता येत नाही; त्याचप्रमाणे द्रव्यापासून त्याचे गुण वेगळे करता येत नाहीत. द्रव्यामध्ये होणाऱ्या क्षणिक बदलांना पर्याय म्हणतात, तर कायमस्वरूपी राहणारे धर्म म्हणजे गुण होत.

आगम ग्रंथ संदर्भ

द्रव्याश्रया निर्गुणागुणाः ।।४१ ।।

तत्त्वार्थसूत्र

ण वि होदि दव्वविहीणो गुणो य गुणदो य दव्वमत्थंतरं। पंचास्तिकाय गाथा १३

अत्थिप्तं च पमेयं अगुरुलहू सव्वदव्वसामण्णा। गाथा ५०

नियमसार

जीवस्स य चेदणा पुग्गलस्स य फरिस रस गंध वण्णा। गाथा ५१

नियमसार
पुढे: द्रव्याचे पर्याय
🏠मुख्य पान📿जिनवाणी⛰️तीर्थक्षेत्र📖आगम🧘तत्त्वज्ञान