देश घाती व सर्व घाती कर्म

देश घाती कर्म
ज्या कर्म प्रकृती जीवाच्या आत्मगुणांचा संपूर्ण नाश न करता केवळ अंशतः (काही प्रमाणात) घाता करतात किंवा आच्छादित करतात, त्यांना देश घाती कर्म म्हणतात. 'देश' म्हणजे अंश किंवा भाग.

देश घाती कर्म स्वरूप:
  • या कर्मांच्या उदयानंतरही जीवाचा मूळ गुण पूर्णपणे नष्ट होत नाही, तर त्याची क्षमता काही प्रमाणात कमी होते.
  • यामुळे जीवाचे ज्ञान, दर्शन इत्यादी गुण अंशतः प्रकट राहतात, परंतु संपूर्ण क्षमतेने काम करू शकत नाहीत.
  • प्रत्यक्ष उदाहरण: डोळ्यांवर काच किंवा काळा चष्मा आल्यावर जसे सर्व काही पूर्णपणे दिसत नाही, पण काही प्रमाणात दिसते; तसेच देश घाती कर्माचे आहे.
  • ज्ञानावर्णीय आणि दर्शनावर्णीय कर्मांमधील भेद: काही ज्ञानवरणीय कर्मांचे प्रकार हे देश घाती असतात, ज्यामुळे व्यक्तीला संपूर्ण ज्ञान नसले तरी थोडेफार (अंशतः) ज्ञान प्राप्त होते.
सर्व घाती कर्म
ज्या कर्म प्रकृती जीवाच्या मूळ आत्मगुणांचा संपूर्णपणे (सर्वार्थाने) घात करतात किंवा त्यांना पूर्णपणे झाकून टाकतात, त्यांना सर्व घाती कर्म म्हणतात.

सर्व घाती कर्म स्वरूप:
  • या कर्मांच्या तीव्र उदयानंतर संबंधित आत्मगुणाचा पूर्णपणे लोप पावल्यासारखी स्थिती होते. तो गुण पूर्णपणे झाकल्या जातो.
  • जोपर्यंत सर्व घाती कर्माचा उदय असतो, तोपर्यंत जीवाचा तो गुण बाह्यतः अजिबात प्रकट होऊ शकत नाही.
  • प्रत्यक्ष उदाहरण: डोळ्यांवर पट्टी बांधल्यामुळे जसे अजिबात काहीच दिसत नाही, तसेच सर्व घाती कर्मांमुळे आत्मगुणांची स्थिती होते.
  • मोहनीय कर्म: मोहनीय कर्माच्या अनेक प्रकृती या सर्व घाती असतात, ज्यामुळे जीवाचे चारित्र्य आणि सम्यक दर्शन पूर्णपणे झाकले जाते.
घाती कर्मांच्या ४ मुख्य प्रकारांत देशघाती व सर्वघाती भेद:   
आठ कर्मांपैकी पहिले ४ घाती कर्म आहेत:
  • ज्ञानावरण कर्म: याचे मतिज्ञान, श्रुतज्ञान, अवधिज्ञान आणि मनःपर्ययज्ञान आवरणारे प्रकार देशघाती आहेत, तर केवलज्ञान आवरणारे कर्म सर्वघाती आहे.
  • दर्शनावर्णीय कर्म: चक्षुदर्शन, अचक्षुदर्शन व अवधिदर्शन आवरणारे प्रकार देशघाती आहेत; तर निद्रा (झोप निर्माण करणारे प्रकार) आणि केवलदर्शन आवरणारे कर्म सर्वघाती स्वरूपात कार्य करतात.
  • मोहनीय कर्म: याचे दर्शनमोहनीय (सम्यङ्मिथ्यात्व सोडून)आणि चारित्रमोहनीय (नोकषाय व संज्वलन चे 4 सोडून सोडून बाकी सगळे) अंतर्गत येणारे सर्व  कर्म सर्वघाती असतात, जे आत्म्याचे सम्यकत्व आणि शुद्ध चारित्र्य पूर्णपणे नष्ट करतात. नोकषाय, संज्वलन चे 4 कर्म व सम्यङ्मिथ्यात्व हे देशघाती असतात.
  • अंतराय कर्म: दान, लाभ, भोग, उपभोग आणि वीर्य (शक्ती) यांत अडथळा आणणाऱ्या या कर्मांचे विविध स्पर्धक देशघाती असतात. 
जीवाचे भाव व देशघाती आणि सर्वघाती कर्म प्रकृतींचा संबंध 
जीवाच्या ५ मुख्य भावांपैकी (औदयिक, औपशमिक, क्षायिक, क्षयोपशमिक आणि पारिणामिक) देशघाती आणि सर्वघाती कर्मप्रकृतींचा संबंध 'क्षायिक भाव' आणि 'क्षयोपशमिक भाव' या दोघांशी येतो.
क्षयोपशमिक भाव आणि देशघाती/सर्वघाती कर्म

क्षयोपशमिक भाव आणि देशघाती व सर्वघाती कर्माशी संबंध:
  • सर्वघाती कर्माचा 'सदवस्था रूप उपशम': क्षयोपशमिक भावात सर्वघाती कर्मांच्या तीव्र स्पर्धकांचा (शक्तीचा) उदय होऊ दिला जात नाही, तर ते दाबले जातात किंवा त्यांचा अनुभाग क्षीण केला जातो.
  • देशघाती कर्माचा 'उदय': क्षयोपशमिक भावात केवळ देशघाती कर्मप्रकृतींचाच उदय असतो. सर्वघातीचा उदय नसतो.
  • परिणाम: देशघाती कर्माच्या उदयामुळे आत्म्याचा मूळ गुण (उदा. ज्ञान, दर्शन, वीर्य) पूर्णपणे झाकला जात नाही; तर तो अंशतः उघडा/प्रगट राहतो.
  • उदाहरण: आपण सामान्य जीवांमधील जे मतिज्ञान, श्रुतज्ञान, अवधिज्ञान, मनःपर्ययज्ञान, चक्षुदर्शन, अचक्षुदर्शन, अवधिदर्शन आणि दान-लाभ-भोग-उपभोग-वीर्य पाहतो, हे सर्व क्षयोपशमिक भाव आहेत. हे भाव देशघाती कर्माच्या उदयामुळे आणि सर्वघाती कर्माच्या उपशमामुळेच शक्य होतात.
क्षायिक भाव आणि देशघाती व सर्वघाती कर्माशी संबंध:
  • दोन्ही प्रकारच्या कर्मांचा पूर्ण क्षय: क्षायिक भाव प्राप्त होण्यासाठी केवळ देशघातीच नाही, तर सर्वघाती आणि देशघाती अशा दोन्ही कर्मप्रकृतींचा (घाती कर्मांचा) पूर्णपणे नाश करावा लागतो.
  • पूर्ण आत्मिक प्रकटता: जेव्हा सर्वघाती व देशघाती कर्मांचे एकही आवरण उरत नाही, तेव्हा आत्म्याचा मूळ गुण १००% शुद्ध रूपात प्रगट होतो.
  • सर्वघाती 'केवलावरण' आणि देशघाती ज्ञानावरणाचा क्षय झाला की 'क्षायिक ज्ञान' (केवळज्ञान) प्रगट होते. 
  • दर्शनावर्णीय कर्मांचा क्षय झाला की 'क्षायिक दर्शन' (केवलदर्शन) प्रगट होते.
  • मोहनीय कर्माचा समूळ क्षय झाला की 'क्षायिक सम्यक्त्व' आणि 'क्षायिक चारित्र्य' प्रगट होते.
  • उदाहरण: अरिहंत आणि सिद्ध भगवंतांमध्ये असणारे सर्व गुण (अनंत ज्ञान, अनंत दर्शन, अनंत सुख, अनंत वीर्य) हे शुद्ध क्षायिक भाव आहेत.

अध्यात्मिक दृष्टिकोन व महत्त्व:
जैन दर्शनानुसार, जोपर्यंत हे सर्वघाती आणि देशघाती कर्म अस्तित्वात असतात, तोपर्यंत जीव संसारचक्रात भटकातो. जेव्हा साधना, तप आणि संयमाद्वारे सर्वप्रथम सर्वघाती कर्मांचा पूर्ण क्षय केला जातो, तेव्हा आत्म्याचे अनंत ज्ञान, अनंत दर्शन आणि अनंत शक्ती प्रकट होतात आणि जीव 'अरिहंत' पद प्राप्त करतो.

संबंधित संकल्पना

क्षायिक भावक्षायोपशमिक भाव
पुढे: अघाती कर्म →
📝 नवीनतम प्रश्नमंजुषा: दीपावली विशेष प्रश्नमंजुषा – भगवान महावीर निर्वाणसोडवा →
🏠मुख्य पान📿जिनवाणी⛰️तीर्थक्षेत्र📖आगम🧘तत्त्वज्ञान